समुह निवासी वसतिगृह एटापल्ली-१
आमच्या वसतिगृहात सकाळ ते संध्याकाळ काय व केंव्हा करायचे याचे मोठेसे वेळापत्रकच बाहेर लावलेले असायचे (आजही असावे). समुहनिवासी वसतिगृहाच्या इमारतीची रचना ईंग्रजी सी (चौकोनी ) सारखी व असे दोन सी एकमेकासमोर (न चिटकविता ) ठेवलेत तर जे तयार होईल अगदी तशी. एका सी मध्ये मुलींचे निवासस्थान असायचे तर दुस-या सी मध्ये मुलांचे. या दोन सीच्या मधोमध जी मोकळी जागा आहे त्या जागेवर पहाटेची प्रार्थना, जेवण, सामुहिक अभ्यासा व्यतिरिक्त विटिदांडु, लगोरी, कंचे, चव्वा अष्टा असे खेळ खेळायचो आणि इतर काही कार्यक्रम पण घेतले जात. मुलींच्या इमारतीतील एक खोली स्वयंपाकघर म्हणुन वापरली जात असे. आमच्या वसतीगृहात मुलांची संख्या २००च्या घरात ( कारण नेमका आकडा मला आठवत नाही ) व मुलींची संख्या १५० घरात असायची. इथे प्रत्येक गोष्ट करायला नियम होते, पहाटे उठणे, प्रार्थना करणे, अभ्यास करणे, रोज आंघोळ करणे, जेवणा आधी हात-पाय धुणे, ताटात खाणे व वरुन ते धुवून दुसर्यांदा वापरण्यासाठी जपुन ठेवणे, शाळेत रोज (कधी मधी जायची सवय होती ) जाणे, सायंकाळी परत प्रार्थना, जेवणाची पंगत, जेवल्यावर दहा वाजेपर्यंत अभ्यास, रात्रो १० वाजता झोपणे व पहाटे ५ ला साखर झोपेत असताना कॅप्टन नावाचा जल्लाद आंगावरची चादर ओढुन उठवायचा. डोळे कुस्कुरत दोन इमारतीच्या मधल्या पटांगणात जाऊन प्रार्थनेसाठी उभं राहावं लागत असे, सुरुवातीचे काही दिवसतर प्रार्थनेचे बोलच कळेनात, नंतर नंतर अर्ध्या झोपेतच रांगेत उभा राहुन “चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली” म्हणायला शिकलो. पण मला रोज प्रश्न पडायचा तो हा की ” साला हा मुकुंदा आहे तरी कोण, आणि याच्या नावाने गाणं म्हणायला आमची फजिती का म्हणुन केली जाते? “
आणि माझा कुडकेल्लीचा आत्तापर्यंतचा दिनक्रम अगदी वेगळा होता. तिसरा कोंबळा आरवला की आई उठवायची, डब्बा घेऊन थेट रानात. येताना टेंबराचं किंवा लिंबाचं दातुन तोंडात, घरी येऊन हात पाय धुतले की एक ग्लास आंबिल (आंबिलला इकडे काय म्हणातात माहित नाही) प्यायचो, हातात कु-हाड घेऊन शेतात. सकाळचे दहा वाजेपर्यंत शेतातलं काम चालायचं, दहाच्या सुमारास आई जेवण घेऊन यायची. परसाच्या पानाचा डोप्पा ( पत्रावळी पासुन तयार केलेला ताट म्हणा ) घ्यायचा, भात व भाजी डोप्प्यात ओतुन ढोसुन दयायचो, जेवण झालं की डोप्पा फेकून दिला जातो, रि-युज प्रकार माहितच नाही, आणि इथे ताट धुवुन ठेवणे व परत त्यातच जेवणे माझ्यासाठी कंटाळवाणं काम होतं. अभ्यास करणे तर आम्हाला माहितच नाही, शेतातील सगळी काम उरकणे, गुरं-ढोरं चारणे व हे सगळं करुन जर वेळ मिळालाच तर मग अभ्यास. जेवताना “वदनी कवळ घेता” नी तर लिटरली माझा छळ केला होता. झोपताना, उठताना ठीक होतं, पण आता खातानाही गाणं, अरे हा काय प्रकार आहे, नीट खाऊही देत नाही. बरं वरुन काय तर रोज आंघोळ, ते ही नळा खाली. आपल्याला सवय होती ती दिवसभर मस्त काम करायचं व सायंकाळी घराची वाट धरण्याआधी नदीत जाऊन उड्या मारायच्या, व काही वेळा नदीत जायला मिळालं नाही की मग आंघोळिला बुट्टी, सकाळी आंघोळ करणे तर माहीतच नव्हतं. सकाळी आंघोळ केली जाते हे मला पहिल्यांदा गावच्या पटवार्याला आंघोळ करतान बघुन कळलं. रात्रीचं जेवण फार फार तर ७.३०, या पेक्षा उशीरा जेवल्याचं मला तरी आठवत नाही, आणि जेवणानंतर अर्ध्या तासाच्या आत ताणुन देणे, हा असा नित्यक्रम असायचा. आणी इथे मात्र रात्री १० पर्यंत अभ्यास, अहो मधुचंद्राच्या रात्रीही नविन जोडपं १० पर्यंत जागत नसावं, आणि मला मात्र अभ्यासाच्या नावाखाली रात्रीच्या १०चं तोंड बघावं लागत असे. तर ह्या अशा टिपिकल गावठी लाईफस्टाईल मधुन सुशिक्षीत लाईफस्टाईलची एकदाची सुरुवात झालीच, व हळु हळू वसतिगृहातील वातावरणात रमु लागलो.
वसतिगृहातिल वातावरण
आमच्या वसतिगृहातिल वातावरण पण खुप मजेशीर होतं, शाळेची सुरुवात व्हायची ती जुन शेवट किंवा जुलैचा पहिला आठवडा. पावसाळ्याचे दिवस. बरं वसतिगृहात शिकायला येणारे विदयार्थी हे १-७ वर्गात शिकणारे. इथे सगळं स्वत़:लाच करावं लागत असे, जसे उठल्यावर चादर घडी करुन ठेवणे, ब्रश करणे, आंघोळ, कपडे धुणे, वाळत घालणे, आठवणीने वाळलेले कपडे परत आणणे, शाळेची तयारी करणे, होमवर्क करणे पासुन सगळीच कामे स्वत:च करायची असतात. ४-७ वीत शिकणारे विधार्थी तुलनेने मोठे असतात, म्हणजे त्यांना किमान स्वतःची कामं तरी करता येतात, पण १-३ वर्गात शिकणा-या विदयार्थ्यांची फारच अडचण होत असे. एक तर हे इतके लहान असतात की त्यान नीट हे ही माहित नसतं की ते नेमकं कशासाठी इथे आलेत. कारण पहिलीत शिकणार्या विदयार्थ्याला शिक्षण, होस्टेल, नियम, शिक्षक, गृहपाठ, ह्यातलं काहीच कळत नाही. गावात शाळा नसल्यामुळे निव्वळ नाईलाजास्तव पालकानी मुलांना इथे सोडलेलं असतं, १लीचं शिक्षण काय होस्टेलात राहायचं वय आहे का ? छे, या वयात तर खाल्यावर हात धुणे सुद्धा नीट कळत नाही, आईनी भरवुन दिल्यास खायचं वय असतं आणी इथे सगळि काम स्वतः करताना या लहान मुलांची फारच दमछाक व्हायची. त्या मानाने आमच्या कुडकेल्लीत ३ री पर्यंतचं शिक्षण असल्यामुळे मी जरा लक्कीच होतो.
सकाळची प्रार्थना व आमचा कॅप्टन :
होस्टेल मधे दोन विध्यार्थ्याना मिळुन एक लोखंडी कॉट मिळत असे. त्या सी आकाराच्या इमारतीत खोल्या वैगरे प्रकारच नाही, पूर्ण लाबंच्या लांब एकच मोठा हॉल आहे, मध्ये चालायला वाट सोडुन दोन्ही बाजुनी कॉट टाकलेले असायचे, कॉटवर पायाशी सामानाची पेटी ठेवलेली असायची, रात्री बरेचदा झोपेत या पेटीवर पाय आपटुन आवाज व्हायचा व शेजारचे झोपमोड करतोस म्हणुन शिव्या घालायचे. पहाटे ५ वाजता मस्त साखर झोपेत असताना कॅप्टन बाहेर वर्हांड्यात लागलेली बेल वाजवायचा, काहि मोठी पोरं या बेलच्या आवाजाने उठायचे व सु वैगरे करायला निघुन जायचे आणि तोंडावरुन पाणी वैगरे घेऊन पहाटेच्या प्रार्थनेच्या रांगेत उभे राहायचे, पण मला मात्र या बेलचा आवाज केंव्हाच येत नसे. बेल वाजविल्यानंतर आमचा कॅप्टन एकदा पुर्ण हॉल मधे या टोकापासुन त्या टोकापर्यंत पायाजवळच्या पेटीवर काठीने ठोsss ठोsss ठोsss मारत ” ऊठा रे, ऊठा रे” असा ओरडत एक चक्कर पूर्ण करायचा. बरीच मुलं या यावेळी उठुन बाहेर वर्हांड्यात जात आणी पार्थना सुरु होतं असे. एकदा प्रार्थना सुरु झाली की मग मात्र मला ते शब्द “चल उठ रे मुकुंदा” ऐकु येतं आणी मी खडबडुन जागा होत असे, चादर तशीच टाकुन धावत धावत पटांगणात जाऊन कुठल्यातरी रांगेत शेवटी उभा होत असे. एरवी माझी उठण्याची पद्धत जरा वेगळीच असे, आईनी आवाज दिला की हुं, हा, उठतो ना, दोन मिनिट, पाच मिनिट एक मिनिट व नंतर मस्त एक्-दोन वेळा आळस दयायचा, व आता आई रागावणार हे लक्षात आल्यावर हळुच उठायचो. पण इथे मात्र माझी उठण्याची पद्धतच विसरुन गेलो, जाग आली की आधी कॅप्टन आजु-बाजुला कुठे दिसतो का, हे तपासुन बघायचो, आळस देणे तर दुरची गोष्ट, त्या प्रार्थनेचा धाक एवढा की दिवाळिच्या सुट्टीत गावाला आल्यावर दुपारच्या झोपेतुन उठल्यावरही प्रार्थनातर चुकली नाही ना म्हणुन दचकायचो. इथे मात्र डोळ्यात झोपेची गुंगी असायची, कधी प्रार्थना म्हणायचो तर कधी नुसतीच हजेरी लावायचो. एकदा प्रार्थना संपली की मोठी मुलं जे आधी उठायची ती सरळ हॉल मधे अभ्यासाला बसायची. पण मी आणि माझ्यासरखी काही मित्र आत्ता हात पाय धुण्यासाठी व तोंडावर पाणी घेण्यासाठी नळाकडे वळायचो. पहिलीत शिकणार्या विद्यार्थ्याना सुरवातीचे काही महिने या पासुन सूट होती पण दिवाळी नंतर त्यांनाही हे बंधनकारक होतं. त्यांची तर धमाल असायची, कॅप्टन त्यांची पेटी बडवुन बडवुन थकुन जायचा, पार्थना चालु असताना मधेच एकदा हॉल मध्ये चक्कर टाकायचा व झोपलेल्या मुलांच्या अंगावरील चादर काढुन घ्यायचा, या नंतर काही मुलं उठुन वर्हांड्यात यायची पण हि पहिली दुसरितली मुलं मात्र चादर काढल्यावरही मस्त झोपुन राहायची. नंतर त्या कॅप्टनचा तोल गेला की काठीने हलक्या हाताने झोपलेल्या या मुलाना मारायचा मग मात्र ती मुलं उठून बसायची. प्रार्थना संपवुन आम्ही आत जात असताना ही पिल्लं (तसं मी ही पिल्लूच, पण त्यांच्यापेक्षा जरा मोठा ) डोळे कुस्करत बाहेर पडायची, तोंडावर पाणी घेऊन परत आली की अभ्यासाला बसावं लागत असे. पहिली ते चवथी ची शाळा दुपारची असायची व ५वी ते ७वी ची शाळा सकाळची असायची. म्हणुन ५-७वी चे विद्यार्थी अर्धा तास अभ्यास करुन आंघोळीसाठी बाहेर पडायची व ७ वाजता शाळेत जायची. मी चवथ्या वर्गात असल्यामुळे माझी शाळा दुपारची असायची. पहाटे ५ ला उठल्यामुळे झोप अपुर्णच, एकदा का कॅप्टन शाळेला निघुन गेला, की मग आम्ही दुपारची शाळावाले ताणुन द्यायचो. कॅप्टन मात्र् लै चतुर, होस्टेल पासुन शाळा अगदी २०० मिटर अंतरावर, एखाद्या तासाला शिक्षक आले नाहीत तर हा हमखास होस्टेलला चक्कर मारायचा मग जे मुलं झोपलेले असायचे त्यांना चांगलच बदडून काढायचा. झोपेत इतर कुठलेच आवाज येत नसत, पण कॅप्टन कुणालातरी मारत असल्यास मात्र कितीही झोपेत असलो तरी आवाज यायचा. मग मी पटकन उठुन पुस्तक ( कित्येक दिवस पुस्कत म्हणायचो) हातात धरुन वाचन्याचं नाटक कारायचो. तरी कॅप्टनला बरोबर कळायचं, पाठिवर एक धपाटा पडायचाच.
वर्हांडा शी प्रकरणः
पावसाळयाच्या दिवसात रात्री शी ला लागली एक मोठा प्रश्न पडायचा, बाहेर जायची भीती, वरुन पाऊस पडत असायचा, खिडकितुन नुसतं बाहेर पाहिलं तरी त्या अंधारात नको ते चित्र विचित्र प्राण्याच्या आकृत्यांचा भास व्हायचा. शी ला तर जावेच लागे पण कुणाला उठविणार, आणी ज्याला उठवु तो मदत करेलच काय गॅरंटी. या आधी एक दोन वाईट अनुभव आले होते, शी ला जायचं म्हणुन शेजारच्याला उठविल तर तो म्हणे जा एकटाच, काहि होत नाही, मग काय हॉल मधुन हळुच वर्हांडापर्यंत आलो, बाहेरचं अंधार बघुन अर्धा जीव निघुन गेला, तरी हिम्मत करुन पुढे जायचं ठरवलं, रात्रीच्या अंधारात काहिच्या काहि भास होऊ लागले, चुपचाप परत येऊन झोपलो. कुणी तरि दुस-याच पोरानं वर्हांडयात शी केली आणी ज्याला मी रात्री मदत मागितली त्यानी माझं नाव कॅप्टनला सांगितलं की मी रात्री शी साठी उठलो होतो. मग ते सगळं माझ्यावर आलं व कुठल्यातरी पोराची शी मला साफ करावी लागली. मग मात्र यातुन धडा घेऊन मी या बाबतीत खुप चॅप्टर झालो, ( काय चॅप्टरगीरी कारायचो ते इथे नाही लिहणार) पण काही मुलं (खास करुन लहान पहिली दुसरित शिकणारी) मात्र शी च्या बाबतीत नेहमी मार खायचे. ही पोरं वर्हांड्यात, प्रार्थनेच्या ग्राऊंडवर, नळाजवळ, कुणी दारामागे, तर कुणी कॉटवरच शी करायचे, पण या शी बहाद्दुर टिमची खास आवडिची जागा बनली ती वर्हांडा. आता रोज वर्हांडा प्रकरण वाढु लागले होते, सगळी पोरं त्रस्त होती, आमचा कॅप्टन तर माझ्याकडेच शंकेने बघायचा, कुणीहि शी केली तरी आधी सकाळी मला बोलवायचा आणी दटावुन विचारायचा, “मध्या खरं खरं सांग, खरं बोललास तर मारणार नाही, शी तुच केली ना” मी मात्र कंटाळून गेलो होतो, कुणीही केली की आधी बोट माझ्याकडेच दाखविल्या जाऊ लागले मला एखादा तरी धपाटा बसायचाच, नंतर मात्र हळू हळू शी मेंबरांची नावं बाहेर पडु लागली. पण हा वर्हांडा शी प्रकरण इतकं चिघळलं की हा मारुन झोडुन सुटणारा प्रश्न नव्हे हे कॅप्टनच्या लक्षात आलं. त्यानी नंतर १०-१२ मोठ्या मुलांची नेमनूक केली व सगळ्या लहान १-३री त शिकणा-या मुलानी रात्री शी आल्यास ह्यातील जो कुणी तुमच्या जवळपास असेल त्याला उठवावे व मोठया मुलानी कुरकुर न करता लहान मुलांची मदत कारावी हे ठरलं आणी एकदाचा शी प्रकरण निकाली लागला.
सामुहिक स्नानः
सकाळचा अभ्यास झाला की ८ नंतर आंघोळिची वेळ असायची. सकाळी ८ ते १० च्या वेळेत आम्ही सगळे १-४ थ्या वर्गात शिकणारे एकाच वेळी आंघोळीसाठी कॉमन बोअरवेलवर धडकायचो. आमच्या होस्टेल मधे दोन बोअरवेल होते, एक मुलींच्या ईमारतीजवळ (फक्त मुलींसाठी) व दुसरा मुलांच्या ईमारती जवळ (कॉमन). पण एकाच वेळी सगळे उगवत असल्यामूळे आंघोळीची अडचन व्हायची, मग काय एकाने बोअरवेल हाणायचा व बाकीच्यानी रांगेत उभं राहुन एक मागुन एक पाण्याखाली बसायचं, एक उठला कि दुसरा तय्यार, पहिल्या राऊंड नंतर जरा बाजुल होऊन साबण लावणे व दुसर्या रांऊडमधे आंघोळ पुर्ण होत असे. बरेच वेळा १-२रीतील मुलं आंघोळीचे कपडे घेऊन मुलींच्या बोअरवेलकडे जायचे, मुलीं मात्र घरुनच बादल्या घेऊन यायच्या, बोअरवेलचं पाणी बादलीत घेऊन बाथरुम मधे जाऊन आंघोळ करायच्या. बाथरुम जर मुलीनी भरलेलं असलं तर बोअरवेल मात्र रिकामं पडलं असायचं. तसं मुलाना मुलींच्या बोअरवेलकडे भटकायची परवानगी नव्हती, पण पहिली दुसरीचे मुलं तिथे जाऊन उभी राहिली आणी एखादी मोठी मुलगी शाळेला दांडी वैगरे मारुन होस्टेलाच थांबलेली असली की त्या मुलींतील आईपण जागं व्हायचं, ती स्वतः बोअर हाणायची व हि १-२रीतील पिल्लं पटापट आंघोळ उरकुन आमच्या आधीच शाळेला तयार. रविवारच्या दिवशी तर दिवसभर आंघोळी चालायच्या, बर्याच तायानी (ताई)तर रविवारी कुठल्या मुलाची आंघोळ घालुन देणार हे जाहिरच करुन टाकलेलं असायचं. नंतर नंतर काही क्युट लहान मुलांचं वास्तव्य कायमचं मुलींच्या बिल्डींगमधे असायचं. ह्या पोरांचे इतके लाड व्हायचे की मुली बोलावुन बोलावुन त्याना शाळेसाठी तयार करायच्या. दिवाळी उलटता उलटता लहान मुलांची अर्धी टिम मुलींच्या बिंल्डींगमधे सर्रास वावरताना दिसायची. फक्त झोपायला तेवढं मुलांच्या बिल्डींगमधे यावे लागत असे, पण इतर वेळी तिकडेच पडुन राहायचे.
एस. आर. पी. कँपः
पाचवित गेलो तेंव्हा आमच्या होस्टेलच्या अगदी मागे एक एस. आर. पी. कँप उभारण्यात आलं, त्यांच्या आंघोळीसाठी बोअरवेल पण बसविण्यात (खोदण्यात) आलं. आता माझी सकाळची शाळा असायची, जरी ५ ला उठलो तरी एवढ्या सकाळी आंघोळ करणे जमायचं नाही. मग नुसत पाय्-हात धुवुन चांगलं तयार होऊन आंघोळ न करताच शाळेत जाऊ लागलो. शाळेतुन आल्यावर जेवणानंतर दुपारी आंघोळ करायचो. एकदा दुपारी आंघोळ करायला बोअरवेलवर गेलो, आमचा कॅप्टन कपडे धुत होता. सकाळी आंघोळ न करताच शाळेत गेलो होतो कळल्यावर पाठित धपाटे पडले. कॅप्टनच्या भितीपोटी आंघोळिचा दुसरा पर्याय शोधत असताना एस. आर. पी. कँपचं बोअरवेल डोक्यात चमकुन गेलं. दुसर्या दिवशी आंघोळीचे कपडे घेऊन एस. आर. पी. कँपवर हजर. काही एस. आर. पी. कुठल्यातरी पेट्रोलींगवरुन नुकतेच आलेले व आंघोळ करत होते. मला बघुन एकानी जवळ बोलवलं, ” काय आंघोळ करायची आहे का ?” मी हो म्ह्टल्यावर त्यानी मला बोअरवेलखाली बसवुन त्यांचं स्वतःचच आंघोळीचं साबण लावुन अंग चोळून चोळून माझी आंघोळ घालुन दिली, पुढे दोन दिवस सगळं अंग दुखत होतं. माझं अंग चोळताना ते म्हणत होते “माझा मुलगा पण तुझ्याएवढाच आहे, तो लातुरला (त्यांच्या गावाला) राहतो, २ महिने झालेत गावाला न जाता, पोराची आठवण येत आहे” इ.इ. अशा प्रकारे एकदाचा दुपारच्या आंघोळिचा प्रश्न सुटला. पाचविपर्यंत माझी इतर मुलांशी मैत्री झाली मग त्याना घेऊन एस. आर. पी. कॅम्प मध्ये कायम आंघोळिसाठी जायचो. तिथले जवळ जवळ सगळेच एस. आर. पी. घरापासुन दुर आलेले होते, व आम्हाला बघुन त्यांच्या आठवणी तिव्र होत. नंतर मी नित्य तिथेच आंघोळिला जायचो, पुढे तिथले सगळे एस. आर. पी. ओळखिचे झाले, एक दोन जण तर मंगळवारच्या बाजारातुन आमच्या साठी खाऊ आणुन ठेवायचे, आंघोळीला गेलो की खाऊ दयायचे. अशा प्रकारे आम्हाला त्या एस. आर. पी. कॅम्प मधे वडिलांच्या वयाचे नविन मित्र (?) मिळाले. एकदा आजारी पडलो, दोन दिवस आंघोळीला गेलो नाही त्यानी इतर मुलांकडे चौकशी केली, आजारी आहे कळल्यावर त्यांच्या कॅम्पमधल्या डॉक्टराना दाखवलं व औषधे वैगरे स्वत:च्या पैशातुन घेऊन दिलित. नंतर नंतर त्या एस. आर. पी. कॅम्पचे बॉस (त्यांचा हुद्दा माहित नाही) पण आमची काळजी घेत, पण मी मात्र त्याना जाम घाबरायचो.
